Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसाठी रणनीती स्पष्ट केली
राज्य सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात आले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान, कालपासून शिर्डीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ‘नवसंकल्प शिबिर’ सुरू आहे. या शिबिराला राज्यभरातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती सांगितली.
अजित पवार म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? त्यांनी सांगितलं की ते फक्त साडेतीन तास झोपतात, योगा करतात आणि शरीराला वेळ देतात. त्यांनी मला संपूर्ण कुटुंबाची तपासणी करून घ्यायला सांगितली होती. मीही तुम्हाला सांगतो की, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या,” असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, आज धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात भाषणाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. मला ठरवून टार्गेट केलं जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या भाषणामुळे त्यांच्याविरोधात उठलेलं वादळ थांबवण्याचे काम झाले असल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांची आगामी रणनीती
अजित पवार पुढे म्हणाले की, “महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक इच्छुकाने एक जबाबदार कार्यकर्ता तयार केला पाहिजे. 25 घरांशी संपर्क साधा. एका घरात चार मतं गृहीत धरली तर 100 मतं मिळतील. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने 50 कार्यकर्ते तयार करावेत, ज्यामुळे आपण 20 हजार मतं गोळा करू शकतो.”
“तरुण, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांना पक्षात आणा. प्रत्येक गाव, चौकात पक्षाचा झेंडा लावला पाहिजे. घराघरातून कार्यकर्त्यांची ताकद उभी केली पाहिजे. कुटुंबामध्ये मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या,” असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
26 तारखेच्या आत ‘लाडक्या बहिणींचे पैसे’ खात्यात येणार
पुढे अजित पवार म्हणाले, “यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्तीला प्राधान्य देणारा असेल. 26 तारखेच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. कधी अपयश येतं, पण ते कायमचं नसतं. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे.”
प्रत्येक जिल्ह्याला भेट देणार
“मी प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. एक सरकारी कार्यक्रम असेल तर दुसरा पक्षाचा कार्यक्रम ठरवला जाईल. दर महिन्याला एक मंगळवारी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार आहे. या बैठकीत त्यांना जेवणाची सोयही केली जाईल. पक्षाची प्रतिमा राखण्यासाठी चुकीचं वागणाऱ्यांना पक्षातून काढून टाकले जाईल,” असेही अजित पवार यांनी सांगितले.